Monday, February 2, 2009

पब संस्कृती रुजू देणे योग्य नाही

"पब' ही काही आमची संस्कृती नाही, म्हणून आम्ही तिला कर्नाटकात अजिबात थारा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी घेतली आहे. त्याचबरोबर "श्रीराम सेना' या संघटनेवर बंदी घालणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मंगळूर येथील पबमध्ये "श्रीराम सेने'च्या कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, ""पब ही आमची संस्कृती नाही. ती अत्यंत चुकीची आहे. तिला अजिबात परवानगी देता कामा नये. कर्नाटकात आम्ही त्यास अजिबात थारा देणार नाही.''पबमधील महिलांवर झालेल्या हल्ल्याबाबत ते म्हणाले, ""महिलांवर असे हल्ले करण्याचीही आमची संस्कृती नाही. म्हणून मारहाणप्रकरणी आतापर्यंत ३३ जणांना अटक केली आहे. आवश्‍यकता वाटल्यास "गुंडा कायद्यान्वये' कारवाई करू. अर्थात, संघटनेवर बंदी घालण्याचा प्रश्‍नच नाही. त्याने प्रश्‍न सुटणार नाही. मंगळूरचा प्रकार स्थानिक आहे. त्यावरून कर्नाटक सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. माझ्या सरकारची लोकप्रियता विरोधकांच्या डोळ्यांत खुपत आहे. ''दरम्यान, हिंदुत्वाच्या आधारेच भाजपला सत्ता मिळाली आहे, हे येडियुरप्पा सरकारने लक्षात ठेवावे. सरकार वाचविण्यासाठी हिंदू संघटनांचा बळी देण्याची चूक करू नका. तसे केले तर कर्नाटकातही तुमची अवस्था उत्तर प्रदेशप्रमाणे होईल, असा इशारा "श्रीराम सेने'चे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. गेहलोत यांची सारवासारवराजस्थानात पब संस्कृती रुजू देणार नाही, असे सांगणारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी सारवासारव केली. ते म्हणाले, ""माझ्या मताचा मंगळूर घटनेशी संबंध नाही. महिलांना झालेल्या मारहाणीचे समर्थन नाही; मात्र पब सं स्कृती आणि मॉलमध्ये मुले-मुलींनी हातात हात घालून फिरण्याची संस्कृती राजस्थानच्या हिताची नाही, असे माझे मत आहे.'' दुसरीकडे, मुले-मुली एकत्र फिरण्यामध्ये काय चुकीचे आहे, असा सवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दी क्षित यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment