Monday, February 2, 2009

पोलाद कंपन्यांवरही मंदीचे सावट

जागतिक मंदीमुळे मोठ्या पोलाद उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरही यंदा परिणाम झाला आहे. टाटा समूहाच्या "टाटा स्टील'चा नफा सुमारे ५६ टक्‍क्‍यांनी घटला असून, सज्जन जिंदाल प्रमुख असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीलाही सुमारे १२७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. नाल्को कंपनीने मागणीअभावी उत्पादन कपातीचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.जागतिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी कमी झाल्याने अनेक कंपन्यांना आपले उत्पादन कमी करावे लागले होते. त्याचा फटका चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत बसल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. "टाटा स्टील'नेही पश्‍चिम बंगालमधील आपला निर्मिती प्रकल्प काही दिवस बंद ठेवला होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ५६.३७ टक्‍क्‍यांनी घसरून तो ४६६ कोटी २४ लाख रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा नफा सुमारे १ हजार ६८ कोटी रुपये होता. कंपनीचे उत्पन्नही चार टक्‍क्‍यांनी घसरले असून, यंदा ते ४८१० कोटी रुपये आहे. कंपनीची निर्यातही घसरून ४०४ कोटी रुपयांची झाली आहे. कंपनीचे पोलाद उत्पादन गेल्या कालावधीच्या सव्वा लाख टनाच्या तुलनेत यंदा १.२३ लाख टन झाले आहे.जिंदाल समूहातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत सुमारे १२७ कोटी ५० लाख रुपयांचा तोटा सहन केला आहे. नऊ महिन्यांतील करोत्तर नफाही सुमारे ७० टक्‍क्‍यांनी घसरला आहे. याच नऊ महिन्यांत कंपनीचे एकूण उत्पन्न ३५ टक्‍क्‍यांनी वाढून ते १० हजार ८२९ कोटी रुपये झाले आहे.नाल्को या ऍल्युमिनिअम उत्पादक कंपनीचाही नफा डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ३३ टक्‍क्‍यांनी घसरला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत २२० कोटी रुपयांचा नफा झाला. तत्पूर्वी याच कालावधीत हा नफा ३२९ कोटी रुपये इतका होता. कंपनीचे एकूण उत्पन्नही यंदा ७.८ टक्‍क्‍यांनी कमी झाले असून, ते ११४९ कोटी रुपये झाले आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सी. आर. प्रधान यांनी सांगितले, की कंपनी मार्चपर्यंत उत्पादनकपात कायम ठेवेल.

No comments:

Post a Comment