Monday, February 2, 2009

सातपुड्यातील वृक्षतोडीमुळे पर्यवार्नावर

तलोदा तालुक्‍यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगत वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. वन विभागाने वृक्षतोडीविरुद्ध कडक मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने वन विभागासह विविध यंत्रणांकडून जनजागृतीसाठी सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे. सातपुडा पर्वतरांगांत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात जंगल होते. मात्र वनजमिनीवर अतिक्रमण, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदी कामांसाठी जंगलाचा वापर केला जात आहे. त्यामुळे जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तालुक्‍यातील कोठार, अमोणी, राणीपूर, वाल्हेरी या भागांत काही प्रमाणात जंगल शिल्लक होते. मात्र काही वर्षांपासून सर्रास सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे ही वनसंपदा धोक्‍यात आली आहे.ही वृक्षतोड सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. फक्त जंगलातीलच वृक्षांची कत्तल होत आहे, असे नाही तर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तालुक्‍यात रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या वृक्षांचीही तोड सुरू झाली आहे. त्यामुळे हा परिसर उजाड होऊ लागला आहे. यात गुंतलेले काही संशयित फायद्यासाठी रात्रीच वृक्षतोड करून लाकूड परराज्यांत रवाना करीत असल्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. वृक्षतोडीच्या वाढलेल्या प्रकारामुळे निसर्गाच्या प्रकोपाला सर्वांना सामोरे जावे लागत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्‍त होत आहे.वृक्ष लागवडीची गरजवाढलेल्या वृक्षतोडीमुळे परिसर उजाड होऊ लागला आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता अधिकाधिक वृक्ष लावण्याची व त्यांचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तळोदा- अक्‍कलकुवा मतदार संघाचे विद्यमान आमदार पद्माकर वळवी काही वर्षांपासून अधिकाधिक वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील दुर्गम, अतिदुर्गम गावांपर्यंत विविध वृक्षांची रोपे लावण्यात येऊन त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत. यामुळे काही अंशी का असेना सातपुड्यातील झालेल्या वृक्षतोडीची भर होताना दिसून येत आहे.कारवाईची गरजवृक्ष तोडून जंगल नष्ट करणाऱ्यांविरुद्ध वन विभागाने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढलेली वृक्षतोड पाहता वन विभागाने गस्त वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे वृक्षतोडीला काहीसा आळा बसेल. एकीकडे शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत व अन्य संस्थांद्वारे झाडे जगवा देश वाचवा असा नारा देऊन वृक्षारोपण केले जात आहे. दुसरीकडे सर्रासपणे वृक्षतोड सुरू असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे वन विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. वन विभागाने याविषयी दखल घेणे आवश्‍यक असल्याच्या प्रतिक्रिया वृक्षप्रेमींसह सर्वसामान्यांतून उमटत आहेत.

No comments:

Post a Comment