Monday, February 2, 2009

हॉकीचे पुनर्जीवन

गतवर्ष भारतीय संघ ऑलिंपिकसाठी अपात्र ठरल्यामुळे हॉकी जगतात गाजले. आता हे अपयश धुवून काढण्यासाठी भारताने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याची चाचणीच जणू उद्यापासून सुरू होणाऱ्या पंजाब सुवर्णचषक चौरंगी हॉकी स्पर्धेत होईल. सेक्‍टर 42 स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत भारताची सलामीची लढत न्यूझीलंडविरुद्ध होईल. या लढतीद्वारे स्पर्धेत विजयी सलामी देण्याचे भारताचे लक्ष्य आहे.भारताने आंतरराष्ट्रीय हॉकीत जवळपास वर्षभराने पुनरागमन करताना गेल्याच महिन्यात अर्जेंटिनाविरुद्धची मालिका खेळली. बीजिंग ऑलिंपिक विजेते जर्मनी, युरोपियन विजेते हॉलंड; तसेच कायम धोकादायक ठरू शकणारे न्यूझीलंड यांच्याविरुद्ध भारताची लढत होईल. प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अर्जेंटिनातील पहिल्या दोन कसोटी जिंकल्या; पण त्यानंतरच्या दोन गमावल्या. संदीप सिंग व त्याच्या सहकाऱ्यांना या स्पर्धेत गाफील राहून चालणार नाही. तिन्ही प्रतिस्पर्ध्यांची भारताच्या माफक चुकांचाही पुरेपूर फायदा घेण्याची क्षमता आहे. अर्थात त्यावेळी संघात पुनरागमन केलेल्या अर्जुन हलाप्पा व इग्नेस तिर्कीच्या अनुभवाचा फायदा होईल, अशी भारतीयांची अपेक्षा आहे. ""पंजाब सुवर्णचषक जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा नक्कीच लाभेल. प्रोत्साहित करणाऱ्या प्रेक्षकांना विजयाची भेट देण्याचे आमचे लक्ष्य आहे,'' असे संदीपने सांगितले. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेबाबत चंडीगडमध्ये चांगलेच औत्सुक्‍य आहे. या स्पर्धेसाठी पंजाबच्या ग्रामीण भागात हॉकीचे धडे गिरवत असलेल्या नवोदित हॉकीपटूंना आणण्याचा पंजाब क्रीडा खात्याचा इरादा आहे. अर्थात प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत पंजाब या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेचे सुरुवातीस इएसपीएनवरून प्रक्षेपण होणार होते; पण स्पर्धेसाठी साठ लाखांचे पुरस्कर्ते मिळविण्यात संयोजक अपयशी ठरले व अखेर दूरदर्शनला स्पर्धा प्रक्षेपणाचे अधिकार देण्यात आले.

No comments:

Post a Comment